खिडकीच्या काचेतून नारळाच्या झावळ्या दिसत होत्या.त्या एकमेकांत अश्या गुंतल्या होत्या की त्यांची छानशी चटई विणली गेली होती जणू. त्यातून पोपटी अन हिरवा प्रकाश झिरपत होता. जरी दुपारचे १२ वाजले होते तरी वाऱ्याच्या संथ झुळकी या झावळ्याना झुलवीत होत्या..statistics चे काहीसे रटाळ lecture सुरु असल्याने माझे खिडकीतून लक्ष सतत या झावळ्यान्कडेच जात होत...त्यातला तो पोपटी हिरवा प्रकाश मला चकाकणाऱ्या पाचूसारखा भासत होता...झोप टाळण्यासाठी मी त्या झावळ्यान्कडेच पहात बसले होते...तेवढ्यात एक छोटुसा सुंदर हिरवा पक्षी येऊन बसला. तिथली चुळबूळ पाहून मला उत्सुकता लागून राहिली...लक्ष देऊन पाहिल्यावर असे दिसले की त्या झाडावर पोपटांचे कुटुंबच आहे..,त्यात छोटासा मला जो पक्षी दिसला ते गुबगुबीत पिल्लू होते...त्यांची या झाडावरून त्या झाडावर काहीतरी धावपळ चालू होती...आणि ही धावपळ त्या पिल्लासाठी चालू होती...त्यंचा गडबड गोंधळ पाहून मजा वाटत होती...माझी उत्सुकता मला अनावर झाली आणि lecture संपताक्षणी मी खिडकीकडे धाव घेतली...कितीतरी तरी वेळ मी त्यांची ती धावपळ पहात होते...कोवळ्या सूर्यप्रकाशात त्या पिल्लाची पिसे हिरवी अन निळसर चकाकत होती...ते दृश्य पाहताना मनात विचार उमटत होते...असे वाटले की किती छोटेसे जीव अन किती कष्ट ते...त्यांच्या त्या हालचालींकडे पाहता मनातली मरगळ कशी चटकन निघून जावी...झावळ्यातून झिरपणाऱ्या पाचूसारख्या प्रकाशात न्हाऊन घ्यावे अन मन प्रसन्न व्हावे...तो प्रकाश मनात भरून घेऊन मी अगदी टवटवीत झाले अन खरोखरीच पुढचा दिवस अगदी प्रसन्न गेला...त्या झावळ्या आणि त्यातून झिरपणारा प्रकाश कागदावर उतरवून घ्यावासा वाटला...
